लोक सहभागातून शाळा विकास

 

मदतीचा ओघ सुरू झाला... 

अन जिल्हा परिषद    शाळा घोटसई (ता.कल्याण,जि. ठाणे) बनली स्वप्नांतील   गुणवत्तापूर्ण, भौतिक सुविधा संपन्न आय.एस.ओ. (I.S.O.) मानांकित शाळा

       १५ ऑगस्ट२०१८ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा ७१ वा वर्धापन दिन आमच्या शाळेत अत्यंत दिमाखदार,उत्साहपूर्ण,देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात संपन्न झाला अयाच दिवशी शाळेचे भाग्य उजळणारी गोष्ट घडली. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ब्रिटिश कालखंडात स्थापन झालेल्या अनेकांना उज्वल भविष्य दाखवणाऱ्या शाळेचे रुपडं बदलण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचा रंगारंग कार्यक्रम आटोपल्या नंतर शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, पालक शिक्षक संघ यांची संयुक्त मिटींग झाली सुमारे २ तास विविध संकल्पना मांडल्या गेल्या त्यावर विविधांगी चर्चा होऊन शाळा सहा महिन्यात आ.एस.ओ.(I.S.O.) मानांकित बनवण्याचा पण करण्यात आला.त्यासाठी आवश्यक ती मदत लोकसहभागातून घेणे व सर्वानी त्यासाठी पुढाकार घेणे निश्चित करण्यात आले.त्यासाठी आवश्यक आराखडे व अंदाज पत्रक बनवण्याचे व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीचे विविध उपक्रम नियोजनाचे काम शिक्षकांकडे सोपवण्यात आले. हे काम निश्चितपणे पुढे जाण्यासाठी आय.एस.ओ. मानांकन कमिटी स्थापन करण्यात आली. गावचे तरुण तडफदार सरपंच सन्मा.श्री.विनोदजी मगर  यांची अध्यक्ष म्हणून व इतर उपस्थितान पैकी.....यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मधल्या दोन महिन्यांच्या काळात सगळी सामसूम होती.परंतु आम्हा शिक्षकांचे नियोजन व वातावरण निर्मितीचे काम चालू होते. त्यात पुन्हा एक योगायोग व संधीची आम्ही वाट पहात होतो अश्यातच नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शाळेत १६/१०/२०१८ रोजी विद्येची देवता सरस्वती व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने भव्यदिव्य स्वरूपात 'शारदोत्सवाचे' आयोजन करण्यात आले विविध उपक्रम व विद्यार्थ्यांचा आविष्कार पाहून उपस्थित सर्वजण प्रभावित झाले.पण आम्हाला भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारा निधी प्राप्त कसा होईल याची चिंता ग्रासत होती.अश्यातच माता शारदादेवी व सावित्रीबाईंच्या आशीर्वादाने भाग्यकारक घटना घडली दि.१९ ऑक्टोबर रोजी अनपेक्षितपणे घोटसई ग्रामपंचायतीचे कल्पक सरपंच श्री.विनोदजी मगर शाळेत आले व उद्योगपती सन्मा.संतोषजी कांडपाल यांचा रुपये २५०००(पंचवीस हजार रुपये)चा व स्वतःचा रूपये १०,०००(दहा हजार रुपये)चा असे दोन चेक घेऊन आले.यानंतर आय.एस.ओ. मानांकन मोहिमेने मागे वळून बघितलेच नाही.शिक्षकांनीही पूर्णतः तन मन धनाने स्वतःला झोकून दिले  या स्वप्नाला आपला श्वास बनवले.

शालेय भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी सुमारे 15 लाख रुपयांचा आराखडा व अंदाजपत्रक बनवण्यात आले. ज्यात सुसज्ज टेरेस हॉल, विज्ञान प्रयोगशाळा, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर,  संगणक कक्ष, शालेय बाग, वाचनालय, सुसज्ज कार्यालय, शालेय रंगरंगोटी, ध्वनिक्षेपक यंत्रणा, क्रीडासाहित्य, माध्यान्ह भोजन व्यवस्था वाढप साहित्य, संगीत साहित्य या आवश्यक बाबींना प्राधान्य देऊन त्यांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू करण्यात आले.

हेबिटॅट इंडिया या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सन्मा.महेंदजी वैराळ यांच्या माध्यमातून फ्युचर जनरॅली इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगाने रुपये ७लाख रुपये किंमतीची मुलामुलींसाठी स्वतंत्र अत्याधुनिक स्वच्छतागृह रुपये ३ लाख किमतीचा सुसज्ज हॉल, १.५०लाख किमतीचा संगणक कक्ष, रुपये ४० हजार किमतीचे वॉटर प्युरिफायर ही कामे सुरू करण्यात आली.

उर्वरित कामांसाठी पालक, ग्रामस्थ, युवक मंडळ, महिला बचतगट यांना साकडे घालण्यात आले.खऱ्या अर्थाने ही मोहीम लोकचळवळ बनली.शाळा गावात गेली व गाव शाळेत आले.मदतीचा ओघ सुरू झाला प्रत्येकाने आपल्याला शक्य तितकी मदत देण्याचा प्रयत्न केला.ज्याला आर्थिक मदत शक्य नव्हती त्यांनी आपले श्रम दिले.लहान लहान महिला बचत गटांनी प्रत्येकी १०-२० रुपये वर्गणी काढून, विद्यार्थ्यांनी  खाऊचे पैसे देऊन या पवित्र कार्यात आपला सहभाग दिला.शिक्षकांनी देखील दिवाळी सुट्टी, रविवार सुट्टी, सार्वजनिक सुट्टीचा विचार न करता ध्येयाने प्रेरित होऊन काम केले. अगदी खोरे हाती घेऊन डोक्यावर घमेल्याने माती वाहून सुंदर शालेय बागेचे  स्वप्न दृष्टीपथात येण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर शैक्षणिक गुणवत्ता आघाडीवर राहण्यासाठी देखील शिक्षक बंधुभगिनी कार्यरत होत्या विविध नियोजनबद्ध सहशालेय उपक्रमाबरोबरच गुणवत्तावाढीसाठी सर्वात गाजलेला उपक्रम म्हणजे 'माझा स्वाध्याय-गृहपाठ माझ्याच शाळेत' या अंतर्गत विद्यार्थी संध्याकाळी शाळा सुटल्यावर देखील ५ ते ६ या वेळेत शाळेतच थांबून प्रगत मुले आपला स्वाध्याय-गृहपाठ-शिष्यवृत्ती - नवोदय परीक्षा अभ्यास शिक्षक व गटप्रमुखांच्या पर्यवेक्षणाखाली करायचे तसेच अप्रगत मुलांना शिक्षक यावेळेत मार्गदर्शन करायचे.प्रगत-अप्रगत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा सुवर्णमध्य काढून त्याप्रमाणे उपाययोजना केल्याने आश्चर्य म्हणजे केवळ तीनच महिन्यात सर्व मूल प्रगत झाली.मुल घरी अभ्यास करत नाहीत ही पालकांची ओरड कमी झाली. विविध शैक्षणिक वातावरणामुळे व सहशालेय उपक्रमामुळे त्या शैक्षणिक वर्षात विविध गुणदर्शन स्पर्धा, क्रीडास्पर्धा, कब बुलबुल स्पर्धा, सिद्धगड स्मारक समिती स्पर्धा शिष्यवृत्ती-नवोदय परीक्षात लक्षणीय व स्पृहणीय यश प्राप्त केले.शाळा सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी पादाक्रांत करत होती.

यातच जानेवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सोपे अवघड क्षेत्रावर आधारित बदल्यांचे सत्र सुरू झाले शाळेत कार्यरत असणाऱ्या ९ ही शिक्षकांच्या बदल्या होण्याच्या शक्यतेने सर्वजण हादरून गेले.अगदी विद्यार्थी, पालक ग्रामस्थही गलबलून गेले पण शिक्षकांनी लगेच स्वतःला सावरले सर्वांना समजावले कारण त्यांना आपले ध्येय खुणावत होते.सर्व उदासीनता झटकून पुन्हा कामात झोकून दिले.सुमारे २.५० लाख रुपये लोकवर्गणी व सुमारे १७ लाख रुपयांची कामे स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून साकारली.एका पडीक जागेवर सुंदर असे स्वतः शिक्षकांनी डिझाईन केलेले उद्यान साकारले.कामांसाठी सर्वच घटक तहानभूक विसरून झटत होते.कधी नव्हे ते आपसातील राजकीय अभिनिवेश , वैर बाजूला ठेऊन गावातील पुढारी मंडळी शाळेसाठी एकत्र आली.कित्येक वर्षांनी २६ जानेवारी २०१९ च्या प्रजासत्ताक दिनी गावातील सर्वजण एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले, हे विलोभनीय दृश्य पाहून शाळाच हे करू शकते हे सर्वांच्या लक्षात आले सर्वजण हेलावून गेले.

मधल्या काळात I.S.O. मानांकनाचे परीक्षक शालेय विद्यार्थी गुणवत्ता, भौतिक सुविधा,  दप्तर यांचे परीक्षण करून गेले.शिवजयंतीचा १९ फेब्रुवारी २०१९ चा तो सुवर्णक्षण साकारला आणि जिल्हा परिषद शाळा घोटसईला आय.एस.ओ. (I.S.O.) मानांकनाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. ठाणे जिल्ह्यातील दुसरी व कल्याण तालुक्यातील पाहिली आय.एस.ओ.बनण्याचा बहूमान आमच्या शाळेस मिळाला आणि शाळेचे रूपांतर आमची शाळा आमचा अभिमान आय.एस. ओ. (I.S.O.) मानांकित जिल्हा परिषद शाळा घोटसईत झाले. सर्वांच्या परिश्रमाचे चीज झाले.

' शेवटचा दिस गोड व्हावा '  या उक्तीप्रमाणे ०७ मार्च २०१९ रोजी स्थानिक आमदार , खासदार, जि.प., पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत आय.एस.ओ.(I.S.O.) मानांकन प्रदान सोहळा विविध भौतिक सुविधांचा शाळार्पण समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला परंतु.एका डोळ्यात आसू व दुसऱ्या डोळ्यात हसू होते.हसू यासाठी की,सर्वानी जे स्वप्न पाहिले होते ते विहित नियोजनप्रमाणे अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात साकार झाले होते.आणि आसू यासाठी की,ज्या ९ शिक्षक बंधू-भगिनींनी हे स्वप्न साकार करण्यासाठी तन-मन-धनाने जीवापाड मेहनत घेतली होती त्यापैकी ७ जणांची बदली अन्यत्र झाली होती ज्याचे आदेश याच दिवशी आले होते.परंतु एक पवित्र कार्य आपल्या हातून झाले याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर विलसत होते.या सर्व उभारणीत सिंहाचा वाटा शाळेतील शिक्षकांचाही होता.खूप श्रम घेतले,सुट्टीचे दिवस शाळेसाठी दिले.स्वतःच्या खर्च होणाऱ्या पैशाचा विचार केला नाही.अडचणी आल्या पण कोणीही डगमगले नाही.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माधुरी श्याम सोनार,ज्येष्ठ भाषा पदवीधर विषय शिक्षिका सौ.नीना नितीन नाईक, समाजशास्त्र पदवीधर विषय शिक्षिका सौ.प्रियांका प्रकाश गोंधळी, विज्ञान पदवीधर विषय शिक्षक श्री. संतोष रामभाऊ भागवत, सहशिक्षिका सौ.जयश्री दिपेश शिर्के, श्री.संजय दिनकर टेंभे, श्री.जगदीशचंद्र काशिनाथ कडव, श्री.गुरुनाथ लक्ष्मण धलपे, श्री.नितीन केशव पाटील या सर्वांनी शाळेच्या कायापालटात आपले मोठे योगदान दिले.या सर्व प्रक्रियेत कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.ललिता दहितुले मॅडम, जिल्हा परिषद सदस्या सौ.रेश्माताई चिंतामण मगर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.लोकसहभागातून काय होऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण ही शाळा होय.

 


संकलन श्री.जगदीशचंद्र काशीनाथ कडव

श्री.संजय दिनकर टेंभे (माजी शिक्षक जि.प.शाळा घोटसई,ता.कल्याण,जिल्हा .ठाणे )

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहर्ष स्वागत

  आपणा सर्वांचे स्वागत आहे. या ठिकाणी आपणांस नवनवीन माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद. टिम:- माझी शाळा माझा अभिमान